Pune Rain: पुण्यात आज दुपारनंतर धुव्वादार पावसाला सुरुवात झाली. शहरातील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आले. अनेक भागात रस्त्यावरून वाहने पाण्यात वाहून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. रस्त्यांवर फांद्या कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात झालेल्या पावसाने पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. पुण्यातील सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, लोहगाव, खराडी, पिंपरी चिंचवड, औंध, बाणेर, बालेवाडी भागांत गारांसह जोरदार पाऊस पडला असून पुणेकरांची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र दिसून आले आहे.
झाडपडीच्या 82 घटनांची नोंद
दुपारी अडीच ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत झाडपडीच्या ८२ घटना घडल्याची नोंद अग्निशामक विभागाकडे होती. यासह पाणी साचल्याच्या ६ घटना, तर सीमा भिंत पडल्याची १ घटना घडल्याचा कॉल अग्निशमन विभागाला प्राप्त झाला होता. झाड व भिंत पडून काही ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले.
नवडी, पुणे विद्यापीठ रोड, बाणेर, चव्हाणनगर, औंध, डीपी, सिंहगड रोड, बिबेवाडी गंगाधाम, जनता वसाहत, नवीन प्रशासकीय इमारत काळेपडळ, तरवडे वस्ती, बेटी गावडे रोड, ससाणेनगर, ताडीवाला रोड, कोरेगाव पार्क, महर्षीनगर, धनकवडी, कात्रज, वारजे, वडगाव शेरी कात्रज आणि पाषाण या ठिकाणी झाडपडीचे कॉल अग्निशमन दलाला आले होते. रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम सुरू राहणार आहे. अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली दलाची सर्व यंत्रणा कार्यान्वित असून, २० अग्निशमन वाहने, २ रेस्क्यू व्हॅन आणि जवळपास शंभर जवान कार्यरत आहेत.
महापालिकेच्या हवामान केंद्रानुसार (पाऊस मिली मिटरमध्ये )
– खडकवासला – १०४.२
– सिंहगड रोड – १००.२
– कोंढवा येवलेवाडी – ९२.२
– बिबवेवाडी – ८१.४
– कोथरूड बावधण – ६६.६
– वारडे कर्वेनगर – ५९.२
– वानवडी रामटेकडी – ५४.६
– येरवडा कैलास – ५४
– भवानी पेठ – ५४
– कसबा विश्रामबागवाडा – ५३
– ढोले पाटील रोड – ५०.२
– शिवाजी नगर – ४८
– औंध बाणेर – ४३
– हडपसर मुंढवा – ३७
– नगररोड – ३६.४
खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात किंचित वाढ
खडकवासला धरण क्षेत्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या असून, अडीच तासांत १०४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. शहर आणि परिसरासह जिल्ह्याच्या काही तालुक्यांत गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. चारही धरणांत मिळून १३.८९ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ४७.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एक टीएमसी जादा पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाकडून नमूद करण्यात आले.


