दौंड: दौंड शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे 10 अर्भक मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी दौंड पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पोलीस कॉन्स्टेबल महादेव बिभीषण जाधव यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 25) रोजी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास गोपालवाडी गावाच्या हद्दीत एचपी पेट्रोल पंपाजवळील जिजामातानगर येथील नितीन ढगे यांच्या टाटा शोरूम पाठीमागे कोणीतरी अज्ञात इसमाने मानवी सदृश्य अर्भक व मानवी अवशेष गर्भस्त्राव घडवून ती उघड्यावर टाकून दिले. त्यामुळे अज्ञात इसमाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 89, 90, 271, 272 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार करत आहेत.
प्लास्टिकच्या डब्यांत अर्भक सापडल्याने बेकायदा गर्भपाताचा संशय
हे सर्व अर्भक प्लास्टिकच्या डब्यात बंद केलेले आढळून आले, ज्यामुळे बेकायदा गर्भपात केले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांकडून आसपासचे रुग्णालये, क्लिनिक आणि गर्भपात केंद्रांची चौकशी करण्यात येत आहे. या अर्भकांचे पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर अधिक तपशील समोर येण्याची शक्यता असून, नागरिकांतून या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


