पुणे: तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याबद्दल तसेच तिला धमकावून गर्भपात केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध शनिवारी (दि. ३०) गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी असलेला तरुण वडगाव बुद्रुक भागातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविकेचा मुलगा असल्याची माहिती प्राथमिक पोलीस तपासात पुढे आली आहे.
याप्रकरणी करण दिलीप नवले (वय २८, रा. वडगाव बुद्रुक) याच्याविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुण आणि पीडित तरुणीची २०२१ मध्ये व्यायामशाळेत (जीममध्ये) ओळख झाली होती. त्यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तो तिला भेटण्यासाठी घरी जायचा. तिने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. आरोपीचे अन्य तरुणींशी प्रेमसंबंध असल्याचा संशय तरुणीला होता. त्याबाबत तिने विचारणा केल्यावर त्याने तिला शिवीगाळ व मारहाण केली.
दरम्यान, संशयित आरोपी नवले याने १७ डिसेंबर २०२२ ला तिच्या मोबाइलवर संपर्क साधला. या घटनेची माहिती या तरुणीने माजी नगरसेविका असलेल्या त्याच्या आईला दिली. त्यानंतरही या तरुणाने तिला धमकावून तिच्यावर अत्याचार केले. त्यातून ती गर्भवती राहिल्याने त्याने गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. त्यानंतर २०२४ मध्ये त्याने विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. त्यामुळे पीडित तरुणी पुन्हा गर्भवती राहिली. त्यानंतर त्याने पुन्हा औषध देऊन तिचा गर्भपात केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सिंहगड पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.


