पुणे: राज्यात दोन वर्षांनंतर रेडीरेकनरच्या दरात मोठी वाढ केली आहे. राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने रेडीरेकनर अर्थात वार्षिक बाजारमूल्य दरात केलेली वाढ मंगळवार (दि. १) पासून लागू होणार आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राज्यात सरासरी ३.८९ टक्के इतकी वाढ केली आहे. राज्यात ग्रामीण भागात सरासरी ३.३६ टक्के, पालिका हद्दीत सरासरी ५.९५ टक्के (मुंबई वगळता) इतकी वाढ केली आहे. तर प्रामुख्याने पुणे शहरात रेडी रेकनरमध्ये सरासरी ४.१६ टक्के तर पिंपरी-चिंचवड शहरात ६.६९ टक्के इतकी वाढ केल्याने दुकाने, सदनिका आणि जमिनींच्या किमती वाढणार आहेत.
राज्यात दरवर्षी १ एप्रिलपासून रेडी रेकनरचे नवे दर लागू होतात. त्यानुसार नोंदणी व मुद्रांक विभागाने रेडी रेकनरचे नवे दर लागू केले आहेत. रेडी रेकनरचे दर तयार करताना प्रत्यक्ष नोंदणीकृत व्यवहारांची माहिती गावनिहाय व मूल्यविभाग निहाय एनआयसीकडून संकलित करण्यात आली. याशिवाय स्थावर व्यवसाय
संकेतस्थळ, जागा पहाणी करून प्रत्यक्ष माहिती संकलित करून वाढ अथवा घटीचा क्षेत्र निहाय व मूल्यविभाग निहाय विचार करून हे दर निश्चित करण्यात आले आहेत.
रेडीरेकनरमध्ये राज्यात झालेली दरवाढ
■ रेडी रेकनरमध्ये संपूर्ण राज्यात सरासरी ३.८९ टक्के वाढ
■ राज्याच्या ग्रामीण भागात सरासरी ३.३६ टक्के वाढ
■ नगरपालिका हद्दीत सरासरी ४.९७ टक्के वाढ
■ महानगरपालिका हद्दीत सरासरी ६.९५ टक्के वाढ (मुंबई वगळता)
■ मुंबई महापालिकेत सरासरी ३.३९ टक्के वाढ
■ शहरालगतच्या गावांमध्ये सरासरी ३.२९ टक्के वाढ
रेडी रेकनरमध्ये महापालिकेच्या हद्दीत झालेली दरवाढ
■ पुणे मनपा हद्दीत सरासरी ४.१६ टक्के वाढ
■ पिंपरी चिंचवड हद्दीत सरासरी ६.६९ टक्के वाढ
■ नवी मुंबई मध्ये ६.७५ टक्के वाढ
■ ठाणे पालिका हद्दीत ७.७२ टक्के वाढ
■ कोल्हापूर पालिका हद्दीत ५.०१ टक्के वाढ
■ नाशिक पालिका हद्दीत ७.३१ टक्के वाढ
■ सोलापूर शहरात १०.१७ टक्के वाढ
■ पनवेल शहरात ४.९७ टक्के वाढ


