पुणे: नाना पेठेतील आंदेकर टोळीचा प्रतिस्पर्धी असलेला गुंड सूरज ठोंबरे जामिनावर सुटताच सक्रिय झाल्याने त्यांच्यातील टोळीयुद्ध गंभीर वळणावर पोहचल्याचे संकित पोलिसांना मिळाले आहेत. आंदेकर टोळीच्या नाना पेठेतील बालेकिल्ल्यात ठोंबरे याच्या उदात्तीकरणाची पत्रके वाटण्याचा प्रकार सोमवारी (दि. २५) उघडकीस आला. या परिसरातील गुंडांमधील धुसफूस पुन्हा वाढली असून, टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहराच्या मध्यवस्तीतील बंडूअण्णा आंदेकर, सूरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड यांच्या टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादातून गेल्या काही वर्षांत टोळीयुद्ध भडकले आहे. त्यामध्ये गेल्या दोन वर्षांत दोघांचे बळी गेले. त्याबरोबरच पाच खुनी हल्ल्यांच्या गुन्ह्यांची पोलिस दप्तरी नोंद आहे. या तिन्ही टोळ्यांमधील बहुतांश गुंड तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्याने कारागृहात आहेत. आंदेकर याचा मुलगा व माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या गतवर्षी झालेल्या खुनानंतर या परिसरातील तणाव वाढला. तत्पूर्वी, झालेल्या सशस्त्र हाणामाऱ्यांच्या गुन्ह्यात ठोंबरे याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
वनराज आंदेकर खून प्रकरणी सोमनाथ गायकवाड व त्याचे १५ साथीदार कारागृहात आहेत. येरवडा तुरुंगातून नुकताच जामिनावर सुटलेला ठोंबरे आक्रमक झाल्याची पोलिसांची माहिती आहे. ठोंबरे याचे उदात्तीकरण करणारी पत्रके त्याच्या साथीदारांनी सोमवारी (दि. २६) नाना पेठेतील मंडईमध्ये वाटली. त्या प्रकारामुळे या भागातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. आंदेकर टोळीविरुद्ध ठोंबरे व सोमनाथ गायकवाड यांनी घट्ट हातमिळवणी केल्याची पोलिसांची माहिती आहे.
ठोंबरे याची पत्रके वाटल्याचे लक्षात येताच पोलिसांनी यासंदर्भात योगेश रमेश मोरे, गौरव दिलीप कोठारी, प्रसाद दिलीप धायगुडे (तिथे रा. नानापेठ, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. शहरांत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून, त्यातील सार्वजनिक शांतता, तसेच नैतिकतेला धोका निर्माण होईल, अशा प्रकारचे चित्र, चिन्ह, फलक वा पत्रके सार्वजनिक ठिकाणी प्रसारित करण्याच्या अटीचे उल्लंघन केल्याचे पोलिसांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
नाना पेठेत गेल्या पाच वर्षांपासून आंदेकर व ठोंबरे यांच्या टोळ्यांमधील वैमनस्य टोकाला पोहचले. त्यातून आंदेकर टोळीतील गुंडांनी नाना पेठेत भरचौकात ठोंबरे याचा निकटचा साथीदार निखिल आखाडे याचा २ सप्टेंबर २०२३ ला कोयत्याने तसेच स्क्रू ड्रायव्हरचे वार करून खून केला. या हल्ल्यामध्ये त्याचा साथीदार शुभर दहिभाते गंभीर जखमी झाला. ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड टोळीने गेल्या वर्षी १ सप्टेंबर २०२४ ला माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा निर्घृण खून करून सूड उगवला. तत्पूर्वी या टोळ्यांमधील गुंडांनी परस्परांवर अनेकदा हल्ले केले. त्यासंदर्भात २ सप्टेंबर २०२४ ला पोलिसांनी धडक कारवाई करून टोळीप्रमुख सूर्यकांत राणोजी आंदेकर ऊर्फ बंडूअण्णा (वय ६०), ऋषभ देवदत्त आंदेकर (दोघे, रा. डोके तालीम, नाना पेठ) व त्यांच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या. त्याचबरोबर ठोंबरे टोळीतील गुंडांच्याही रातोरात मुसक्या आवळल्या. आंदेकरविरुद्ध सूरज ठोंबरे याचा साथीदार ओंकार गजानन कुडले (वय २१, रा. गणेश पेठ, बांबु आळी) याने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. नाना पेठ व लगतच्या मध्यवस्तीतील वर्चस्वाच्या वादातून आंदेकर टोळीतील ऋषभ आंदेकर, सुरज ऊर्फ गणेश, माडी गण्या व त्याच्या साथीदारांनी कुडले याच्यावर पालपन, कोयता अशा धारदार शस्त्रांनी खुनी हल्ला केला होता.
तत्पूर्वी, २३ जानेवारी २०२४ ला कुडले व त्याच्या साथीदारांनी महिनाभरापूर्वी (दि. २३ जानेवारी) नाना पेठेत कोयते नाचवत धुडगूस घातला. तसेच एका अल्पवयीन मुलावर कोयत्याचे वार केले. त्यानंतर या दोन्ही टोळ्यांमध्ये वारंवार होत असलेल्या मारामरऱ्या व त्यामुळे निर्माण होत असलेल्या दहशतीमुळे या भागात टोळीयुद्धाची छाया पसरली होती. त्याचा भडका उडण्यापूर्वीच पोलिसांनी या गुंडांची धरपकड केली. दरम्यान, २५ जानेवारी २०२१ला विघ्नेश गोरे या तरुणावर कात्रज-कोंढवा रोडवर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. त्यासंदर्भात कृष्णकांत सूर्यकांत आंदेकर याच्यासह सातजणांना पोलिसांनी अटक केली.
त्यानंतर, १६ मार्च २०२१ ला आंदेकर याच्याशी संबंधित कोंढव्यातील मुनाफ पठाण, कृष्णा आंदेकर व त्यांच्या सहा साथीदारांविरुद्ध पोलिसांनी मोक्काची कारवाई केली. तत्पूर्वी, सूरज ठोंबरे, ओंकार कुडले व त्यांच्या सहा साथीदारांनाही पोलिसांनी मोक्का अन्वये अटक केली. त्या कारवाईतून ठोंबरे याची पंधरवड्यापूर्वी जामिनावर मुक्तता करण्यात आली. त्यानंतर, तो लगेच पुन्हा सक्रिय झाला असून आंदेकर व त्याच्या टोळीत खदखद सुरू झाली असल्याने नाना पेठेतील टोळीयुद्ध गंभीर वळणावर पोहचले असल्याचे मानले जात आहे.


