पुणे: पुणे जिल्हा परिषदेत चक्क नोटांचा पाऊस पडल्याचे मंगळवारी पाहायला मिळाले. जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने झेडपीच्या नोकरभरतीत जिल्हा परिषदेने अन्याय केल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील आतील बाजूस असलेल्या एका मोकळ्या जागेत नोटा उधळल्या. या नोटा उधळत असताना संबंधित कर्मचाऱ्याने स्वतःच्या गळ्यातही नोटांचा हार घातला होता. यामध्ये दहा आणि वीस रुपयांच्या नोटांची संख्या लक्षणीय होती. या घटनेने जिल्हा परिषद मुख्यालयात खळबळ उडाली होती.
दहा दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच नोटा उधळण्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. मावळ तालुक्यातील खडकाळा ग्रामपंचायतीचा हा कर्मचारी असून, अनिल सिरसाट असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. नोटा उधळल्यानंतर काही काळ सिरसाट हे आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले होते. दरम्यान, दुपारी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
जिल्हा परिषदेच्या नोकरी भरतीत एकूण रिक्त जागांपैकी १० टक्के जागा या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतात. या राखीव जागा सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्यात येतात. यानुसार या कर्मचाऱ्याचा सेवाज्येष्ठता यादीत ३४ वा क्रमांक आहे. मात्र, नोकरभरतीत सन २०२१-२२ या वर्षात, अन्याय झाल्याचा आरोप सिरसाट यांनी आंदोलन करताना केला आहे.
खडकाळा (ता. मावळ) ग्रामपंचायतीचे कर्मचारी अनिल सिरसाट यांनी सन २०२१-२२ या नोकरभरती वर्षात ग्रामपंचायत कर्मचारी कोट्यातून भरल्या जाणाऱ्या भरतीत त्यांच्यावर अन्याय झाल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलन केले आहे. शिवाय, या मागणीसाठी त्यांनी मंत्रालयातही आंदोलन केले आहे. त्यांच्यावर मंत्रालयातील आंदोलनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. नियम डावलून नोकरी भरती करता येत नाही. मात्र, अपात्र असूनही नियुक्ती मिळण्यासाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यांचे सिलेक्शन होऊ शकत नाही, असा त्यांचा समज झाला आहे. त्यामुळे दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
– विजयसिंह नलावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग)


