Baramati News : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार आणि काँग्रेसमध्ये जोरदार राजकीय वाद पेटला आहे. काँग्रेसने उमेदवार मैदानात उतरवल्यानंतर पार्थ पवार यांनी पक्षावर टीका केली होती. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करत नाव न घेता त्यांच्यावर सणसणीत पलटवार केला.
काँग्रेसने आपल्या प्रतिक्रियेत “धड भाषणही देता येत नाही आणि कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर खासदार झालेल्या व्यक्तीने काँग्रेसच्या अधोगतीबद्दल बोलणे योग्य नाही,” असा टोला लगावला. तसेच वडिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतरच्या घडामोडींचाही उल्लेख करत अप्रत्यक्ष टीका करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणात काँग्रेसने कर्नाटकात नोंदवलेल्या FIR चा संदर्भ देत संबंधित प्रकरण महाराष्ट्रातही दाखल करण्याची मागणी केली आहे.
याआधी पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत “काँग्रेसने घेतलेला निर्णय चुकीचा असून त्याचे परिणाम महाराष्ट्रात दिसतील,” असा इशारा दिला होता. तसेच “काँग्रेसचा राज्यात डाऊनफॉल सुरू आहे,” अशी टीकाही त्यांनी केली होती.
बारामती पोटनिवडणुकीवरून सुरू झालेला हा वाद आता अधिक तीव्र होत असून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे.


