बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे येत असताना खासगी विमान लँडिंगदरम्यान धावपट्टीबाहेर गेले आणि आग लागून कोसळले.
या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व ६ जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त कळताच पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हा अपघात नेमका कसा झाला यामागचे कारण अद्याप समोर आले नाही.
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम :
१) जिल्हा परिषद निवडणूक प्रचारानिमित्त बारामतीमध्ये आज अजित पवार यांच्या चार सभा होणार होत्या.
२) या सभांसाठी अजित पवार सकाळी साडेसातच्या सुमारास बारामतीला निघाले
३) मुंबई विमानतळावरून ते बारामतीकडे विमानाने रवाना झाले होते
४) नियोजनानुसार सकाळी ९ वाजताच्या सुमारास अजित पवार हे बारामतीमध्ये पोहचणार होते.
५) पावणे नऊच्या सुमारास विमान लँडिंग करताना अपघात झाला. विमान बारामती एअरपोर्टजवळ शेतात कोसळले.
६) अजित पवारांचे विमान कोसळले आणि त्याचे तुकडे होऊन भीषण आग लागली.
७) विमानामध्ये तीन ते चार स्फोट झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जण गंभीर जखमी झाले होते.
८) घटनास्थळावर तात्काळ पोलिस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या.
९) अजित पवारांसह सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
१०) सर्व जखमींची प्रकृती चिंताजनक होती. या सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली
११) या विमान अपघातामध्ये २ पायलट, अजित पवार, त्यांचा सुरक्षारक्षक आणि दोन स्वीय सहाय्यक यांचा मृत्यू झाला.
१२) अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवार, युगेंद्र पवार बारामतीत पोहचले आहेत.
१३) सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार दिल्लीवरून रवाना झाले आहेत.


