HSRP number plate : महाराष्ट्रातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले असून, हा नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. एचएसआरपी नंबरप्लेट न बसवलेल्या वाहनांविरोधात महाराष्ट्र परिवहन विभाग कडक पावले उचलण्याच्या तयारीत आहे.
गोंदिया जिल्ह्यात अद्यापही मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवलेली नाही. जिल्ह्यातील एकूण १ लाख ८२ हजार वाहनांपैकी फक्त १ लाख १० हजार वाहनांवरच एचएसआरपी प्लेट बसवण्यात आली असून, सुमारे ७० हजार वाहनधारकांनी नियमांचे पालन केलेले नाही.
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील अनेक वाहनधारकांनी अद्याप एचएसआरपी नंबरप्लेट बसवलेली नाही. एचएसआरपी प्लेट बसवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही.
सध्या राज्यात आचारसंहिता लागू असल्यामुळे तपासणी व दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नव्हती. मात्र, आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असून, एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर थेट दंड आकारला जाणार आहे, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.
दंड किती भरावा लागणार?
एचएसआरपी नंबरप्लेट न बसवलेल्या वाहनधारकांना १,००० ते १०,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
पहिल्यांदा नियम मोडल्यास १,००० रुपये दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वेळेत एचएसआरपी नंबरप्लेट बसवून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, अन्यथा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.


