Balasaheb Amrale News : महापालिका निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असतानाच, पुण्यातील भारतीय जनता पक्षाला मोठे भगदाड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी शहराध्यक्ष वसंत ऊर्फ बाळासाहेब अमराळे हे २५ वर्षांची पक्षाशी असलेली जुनी साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. मतदानाच्या तोंडावर घडणाऱ्या या घडामोडीमुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
अन्यायाची भावना आणि उमेदवारीचा पेच
बाळासाहेब अमराळे हे शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी (प्रभाग १२) मधील भाजपचा एक महत्त्वाचा चेहरा मानले जातात. २०१२ मध्ये निसटता पराभव झाल्यानंतरही त्यांनी पक्षाचे काम निष्ठेने सुरू ठेवले होते. मात्र, गेली अनेक वर्षे त्यांना निवडणुकीच्या रिंगणातून दूर ठेवले जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रभाग १२ मध्ये जाणीवपूर्वक महिला आरक्षण टाकून अमराळे यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न पक्षातील एका गटाने केल्याचा आरोप होत आहे.
अजित पवारांचा ‘मास्टरस्ट्रोक’
निवडणुकीपूर्वी भाजपने राष्ट्रवादीतून अनेक नेते फोडले होते, त्याचाच वचपा आता अजित पवार काढताना दिसत आहेत. अमराळे यांचा या भागातील दांडगा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे जाळे पाहता, राष्ट्रवादीने त्यांना आपल्या गोटात खेचण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. येत्या १० तारखेला त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता आहे.
गणिते बिघडणार?
या संभाव्य पक्षप्रवेशावर बाळासाहेब अमराळे यांनी सध्या सावध पवित्रा घेतला आहे. पुढील दोन दिवसांत मी समर्थकांशी चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर करेन, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. जर अमराळे यांनी राष्ट्रवादीची ‘घड्याळ’ हातावर बांधले, तर प्रभाग १२ मधील भाजपची हक्काची व्होट बँक फुटण्याची शक्यता असून, याचा थेट फटका महायुतीच्या उमेदवारांना बसू शकतो.


