पुणे : पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील ‘शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट’च्या (जैन बोर्डिंग हाऊस) जमिनीच्या संशयास्पद व्यवहार प्रकरणात शिवसेना (शिंदे गट)चे माजी आमदार आणि महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. या वादग्रस्त प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सहभाग असल्याचे आरोप धंगेकरांनी केले असून, शासकीय अधिकारी, धर्मादाय आयुक्त, बांधकाम व्यावसायिक आणि बँक प्रतिनिधींची सखोल चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना धंगेकर म्हणाले, “ट्रस्टच्या जागेची खरेदी-विक्री करताना एका कंपनीचे मूल्यांकन आणि काही बिल्डर कंपन्यांची भूमिका संशयास्पद आहे. या प्रकल्पासाठी दोन बँकांनी कोणत्या आधारावर कर्ज दिले? प्रशासनाच्या संगनमताने मोठा गैरव्यवहार झाला असून, ऑडिट झाल्यास सर्व काळेपट उघड होतील.” पोलिसांनी सहा दिवसांत कारवाई न केल्यास न्यायालयाचा मार्ग अवलंबणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
३ एकर जमिनीच्या विक्रीतून उफाळलेला वाद
पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील जैन बोर्डिंग हाऊस ही ३ एकर मोक्याची जमीन आहे, जी जैन समुदायाच्या ट्रस्टकडे आहे. या जमिनीची विक्री गोखले बिल्डर्सला २३० कोटी रुपयांना करण्याचा प्रस्ताव होता, ज्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सहभाग असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला.
धंगेकरांच्या मते, ही विक्री ट्रस्टच्या हिताविरुद्ध असून, जमिनीचे मूल्यांकन कमी दाखवून बँक कर्ज आणि सरकारी मंजुरी घेतली गेली. या प्रकरणात धर्मादाय आयुक्तांनी ३० ऑक्टोबरपर्यंत स्टेटस क्वो आदेश दिले असून, गोखले बिल्डर्सने व्यवहार रद्द करण्याची घोषणा केली आहे. तरीही धंगेकर आक्रमक असून, ट्रस्टच्या ट्रस्टींना बरखास्त करण्याची आणि २३० कोटी रुपयांचे फ्रीज करण्याची मागणी करत आहेत.
धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “मोहोळ यांनी गोखले बिल्डर्ससाठी केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर केला. ट्रस्टच्या जागेचा घोटाळा संगनमताने झाला असून, मी मुरलीधर मोहोळ यांचे नाव घेणार नाही, पण पोलिसांनी नायक-खलनायक शोधावे.” या तक्रारीत गोखले बिल्डर, बडेकर बिल्डर आणि इतरांवर संगनमताने घोटाळा केल्याचा आरोप आहे. धंगेकरांनी जैन मुनियोंची भेट घेऊन त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले असून, “पहिला अंक संपला असला तरी उरलेली खुमखुमी असेल तर विरोधात लढा,” असे आवाहन केले.


