Pune ZP Election Result 2026: जुन्नर तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे. जिल्हा परिषदेच्या आठ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे. शिवसेना (शिंदे) गटाने तीन तर शिवसेना (ठाकरे) गटाने एका जागेवर यश मिळवले. पंचायत समितीच्या १६ गणांपैकी शिवसेना (शिंदे) गटाने आठ, राष्ट्रवादी काँग्रेसने सहा, उद्धव गटाने १ तर भाजपाने एका जागेवर विजय मिळवला आहे. भाजपाचा एकमेव विजयी सदस्य शिवसेनेसोबत गेल्यास जुन्नर पंचायत समितीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवण्याची संधी शिंदे गटाला मिळणार आहे.
या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला. भाजपा नेत्या व माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे यांच्या पत्नी जयश्री खंडागळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या स्नुषा कविता पवार तसेच आमदार शरद सोनवणे यांचे निकटवर्तीय संतोष चव्हाण यांचा पराभव झाला.
जिल्हा परिषद निवडणुकीत डिंगोरे–उदापूर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाबाई दाभाडे, ओतूर–धालेवाडी तर्फे हवेली गटातून छाया तांबे, बोरी बुद्रुक–खोडद गटातून कल्पना काळे आणि बारव–तांबे गटातून मोनाली लांडे यांनी राष्ट्रवादीसाठी विजय मिळवला. आळे–पिंपळवंडी, बेल्हे–राजुरी व नारायणगाव–वारूळवाडी गटात शिवसेना (शिंदे) गटाचे उमेदवार विजयी झाले, तर सावरगाव–कुसुर गटात शिवसेना (ठाकरे) गटाचे गुलाबराव पारखे यांनी बाजी मारली.
पंचायत समितीमध्ये डिंगोरे, उदापूर, ओतूर, धालेवाडी, बोरी बुद्रुक, बारव या गणांत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला. आळे, पिंपळवंडी, राजुरी, बेल्हे, नारायणगाव, वारूळवाडी, तांबे व खोडद या गणांत शिवसेना (शिंदे) गटाचे उमेदवार विजयी झाले. सावरगाव गणात भाजपाचा तर कुसुर गणात शिवसेना (ठाकरे) गटाचा उमेदवार निवडून आला. मतमोजणीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. निकाल जाहीर होताच गुलाल उधळून, उमेदवारांना खांद्यावर घेत जल्लोष करण्यात आला.
दरम्यान, मतमोजणीच्या सात फेऱ्या पूर्ण होऊनही वेळेत निकाल जाहीर न केल्याने प्रसारमाध्यमे व पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली. तहसीलदार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनील शेळके यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्यानंतरच अधिकृत माहिती देण्यात आली. याशिवाय मतमोजणीसाठी उपस्थित कर्मचारी व पोलीस दलासाठी दिलेल्या जेवणाच्या दर्जाबाबतही असंतोष व्यक्त करण्यात आला. एकूणच, जुन्नर तालुक्यातील या निवडणुकीत राष्ट्रवादी व शिवसेना (शिंदे) यांच्यात काट्याची लढत पाहायला मिळाली असून पंचायत समितीच्या सत्तेसाठी पुढील राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.


