Ketan Agrawal Murder Case : पुण्यातील चर्चित केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवालच्या हत्येचा कट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रचण्यात आला होता. संशयित सिया आणि चेतन यांनी केवळ हत्येचे नियोजनच केले नाही, तर त्यासाठी पूर्वतयारी आणि सरावही केल्याचे तपासात उघड झाले आहे.
तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांनी इंटरनेटवरील विविध माध्यमांचा आधार घेत हत्येच्या पद्धतींचा अभ्यास केला होता. गुगल आणि युट्यूबवर त्यांनी विविध माहिती शोधून हत्येचा कट अधिक प्रभावीपणे कसा राबवता येईल, याचा अभ्यास केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी चेतन चौधरीने कारऐवजी दुचाकीचा वापर केल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही आणि नोंदींमध्ये वाहनाचा माग काढला जाऊ नये, यासाठी त्याने ही शक्कल लढवल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.
तपासानुसार, घटना घडण्याच्या दिवशी सिया केतनला लोहगडावर घेऊन गेली असताना चेतनही त्यांच्या मागोमाग दुचाकीवरून पोहोचला होता. त्यानंतर नियोजित ठिकाणी केतनला नेऊन त्याला दरीत ढकलण्यात आल्याचा आरोप आहे.
पोलिस तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, आरोपींनी ही घटना अपघातासारखी कशी भासवता येईल, याचाही अभ्यास केला होता. यासाठी त्यांनी लोहगड परिसरात आधी भेट देऊन विविध ठिकाणांची पाहणी केली होती. तसेच, पोलिस तपासापासून कसे बचावता येईल, याबाबतही इंटरनेटवर शोध घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, डिजिटल पुरावे, मोबाईल डेटा आणि इतर तांत्रिक बाबींची सखोल छाननी केली जात आहे.


