Laxman Hake on Ajit Pawar : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवार निवडीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका होत आहे. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे हिने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या एबी फॉर्मवर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गजा मारणे सध्या तुरुंगात असून त्याच्या गुन्हेगारी कारवायांची राज्यभर चर्चा आहे.
याचबरोबर आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड बंडू आंदेकर याची भावजय लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केली आहे. हे सर्व आरोपी सध्या तुरुंगात असून निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी तुरुंग प्रशासनाकडून विशेष परवानगी घेतल्याची माहिती आहे. तसेच कुख्यात गुंड बापू नायर यांच्या पत्नीलाही पुण्यातून उमेदवारी देण्यात आल्याचं समोर आलं आहे.
या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते व आंदोलक लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी आले असताना हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात 67 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचा मुद्दा उपस्थित करत, “या उमेदवारांनी नेमकं कोणतं दिव्य काम केलं आहे? त्यांचे कॅरेक्टर चेक करा, ते कोणत्या पक्षाचे आहेत ते तपासा. बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीत निवडणुका टाळून बिनविरोध निवडी होत असतील तर लोकशाहीचा अपमान आहे,” असा सवाल केला.
अजित पवारांवर थेट टीका करताना लक्ष्मण हाके म्हणाले, “अजित पवार फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेतात, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला नतमस्तक होतात. पण उमेदवारी देताना बोडके, आंदेकर, नायर यांसारख्या गुंडांच्या कुटुंबीयांना तिकीट दिली जातात. मुखात फुले-शाहू-आंबेडकर आणि हातात गुंडांच्या घरात तिकीट देण्याची रणनीती हीच त्यांची खरी ओळख आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
शरद पवार आणि अजित पवार दोघांवरही टीका करताना हाके म्हणाले, “हे दोघे वेगळे नाहीत, एकच आहेत. आज ओबीसी आरक्षण संपुष्टात येत आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या यादी पाहिल्या तर मराठा कुणबी प्रमाणपत्रांच्या नावाखाली ओबीसी आरक्षणावर घाला घातला जात आहे. गुंड, मवाली, पैसेवाले, मनी-मसल पॉवर आणि बोगस दाखले असलेल्यांनाच तिकीट दिली जात आहेत. त्यामुळे लोकशाहीची ऐशी-तैशी झाली आहे,” असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.


