Maharashtra Farmer Loan Waiver : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकार ३० जून २०२६ पूर्वी पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार असल्याची मोठी घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे सांगत कृषिमंत्री भरणे म्हणाले की, कर्जमाफीसाठी विशेष समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्राप्त होईल. त्यानंतर आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करून जून महिना संपण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येईल.
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू आणि अन्य शेतकरी नेत्यांनी तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता कृषिमंत्र्यांनी अधिकृत घोषणा करत राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असून, ग्रामीण भागात आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.


