Maharashtra Heatwave : राज्यात मे महिन्यातही उष्णतेचा कहर कायम असून तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये नागरिकांना भाजून काढणाऱ्या उन्हानंतर आता मे महिन्यातही राज्याला उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे.
विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण पट्ट्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहणार असल्याचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि बीड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हीटवेव्हचा इशारा देण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात उद्याही उष्णतेची लाट कायम राहणार असून छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांत सलग तीन दिवस उष्णतेचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील अमरावती आणि अकोला जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवस हीटवेव्ह अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय वर्धा, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांसाठी उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, थेट उन्हात जाणे टाळणे आणि आवश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.


