Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाट परिसरात सोमवारी भीषण अपघात झाला. खंडाळा घाट उतरताना मंकी हिलजवळील बॅटरी पॉईंट परिसरात मिनी बस उलटल्याने आठ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
कस्तुरी गणेश माळी (१५), कमलाबाई रामचंद्र माळी (७०), गुरुनाथ जयराम डोंगरे (५५), मीनाबाई गुरुनाथ डोंगरे, गुलाबबाई दत्तात्रय हुमणे, रवींद्र रामचंद्र माळी (५०), अशोक जयराम डोंगरे (६०) अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत.
हा अपघात अमृतांजन पुलाच्या वरच्या बाजूला, जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील ‘एचओसी’ ब्रिजजवळ घडला. मिनी बसचा चालक नियंत्रण गमावल्याने वाहन उलटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच आयआरबी प्रशासन, खासगी रुग्णवाहिका, ‘देवदूत’ यंत्रणा आणि स्थानिक मदत पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने खोपोली नगरपरिषद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सुदैवाने, बहुतांश प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून सर्व जखमी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील शेळके पाडा परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. ही घटना खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


