Maharashtra Weather : महाराष्ट्रात मान्सूनचे पूर्णपणे आगमन अद्याप झाले नसल्याने उष्णतेचा तडाखा कायम आहे. भारतीय हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा (हिट वेव्ह) ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, कोकणातील हर्णे-दापोली परिसरापर्यंत नैऋत्य मोसमी वारे पोहोचले असले तरी मान्सूनची पुढील वाटचाल सध्या मंदावली आहे. वातावरण अनुकूल नसल्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला तात्पुरता ब्रेक लागल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड आणि विदर्भातील अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. मुंबईत कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्याने नागरिक घामाघूम होत आहेत.
याशिवाय पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि हलक्या पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात मान्सूनला पुन्हा गती मिळू शकते आणि राज्यातील आणखी काही भागांमध्ये पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदाच्या मान्सूनवर एल निनोच्या प्रभावाचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे काही भागांत पावसाचे प्रमाण कमी राहण्याची, तर काही भागांत मान्सूनचे आगमन उशिरा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याचा परिणाम शेती आणि पेरणीच्या कामांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


