Success Story : सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द, मेहनत आणि सातत्य किती महत्त्वाचं असतं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे छत्तीसगडच्या चारू पांडे. अवघ्या 23 व्या वर्षी त्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 19 स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून अनेकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
लहानपणापासूनच सरकारी सेवेत जाण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या चारू पांडे यांनी शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर विशेष भर दिला. मात्र त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक वेळा अपयश आले, काही परीक्षांमध्ये थोडक्यात संधी हुकली, तर काही ठिकाणी अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही त्यांनी हार न मानता प्रत्येक अपयशातून धडा घेत पुढे वाटचाल सुरू ठेवली.
स्वतःच्या चुका ओळखून त्यांनी अभ्यासाची पद्धत बदलली, वेळेचे योग्य नियोजन केले आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर यशाचा मार्ग तयार केला. त्यांच्या चिकाटीचे फळ म्हणून त्यांनी एसएससी सीजीएल, एसएससी सीपीओ, एसएससी सीएचएसएल, एसएससी एमटीएस, एसएससी जीडी, आयबीपीएस क्लर्क, आयबीपीएस पीओ, एसबीआय क्लर्क आणि एसबीआय पीओ यांसारख्या अनेक प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्या.
एकूण 19 सरकारी परीक्षा पास करण्याचा विक्रम करत चारू यांनी आपल्या मेहनतीची वेगळी छाप उमटवली आहे. आज त्या चेन्नई येथे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) विभागात कार्यरत असून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.
चारू पांडे यांची यशोगाथा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मेहनत, आत्मविश्वास आणि सातत्य असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नसते, हा संदेश त्यांच्या प्रवासातून स्पष्टपणे मिळतो.


