Maharashtra Today Weather : राज्यात पुढील काही दिवस हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही भागात तापमान ४० अंशांच्या पुढे गेले असताना आता ढगाळ वातावरण आणि वादळी पावसामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आज दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात गारपिटीसाठीही पोषक वातावरण तयार होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
३० मार्चपासून राज्यात हवामान अधिक बदलणार असून दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर आणि नांदेडमध्येही अशाच प्रकारचे वातावरण तयार झाले आहे.
येत्या काही दिवसांत खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, उष्णतेचा पारा अजूनही उच्चांकावर आहे. अमरावती येथे ४१.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, तर अकोला आणि वर्धा येथेही ४१ अंशांच्या पुढे तापमान गेले. नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, धुळे, वाशीम या ठिकाणीही ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे.


