Cyclone Alert : राज्यात मोंथाचं संकट निवळताच आता नवं वादळ आकार घेत असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे. उत्तर अंदमान समुद्रात निर्माण होत असलेल्या या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचं आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागानुसार, पुढील ४ ते ५ दिवस राज्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांना या हवामानाचा परिणाम जाणवणार आहे.
आज रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याने ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहील आणि तापमानात चढउतार होईल.
हवामान खात्याने सांगितले की, दोन दिवसांनंतर राज्यात पावसाची उघडीप मिळेल आणि त्यानंतर थंडीस सुरुवात होण्याची शक्यता आहे. उत्तर अंदमान समुद्रात ४ ते ५ नोव्हेंबरदरम्यान ताशी ३५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि समुद्र खवळलेला राहील, असा इशारा दिला आहे. अंदमान-निकोबार बेटांवर ६ नोव्हेंबरपर्यंत वादळी वारे व विजांचा कडकडाट सुरू राहील.
या चक्रीवादळाचा परस्पर परिणाम महाराष्ट्रावर दिसू शकतो. त्यामुळे नागरिकांना हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.


