Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर मुंबई आणि पुण्यासह राज्यातील बहुतांश भागात अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून दुपारी कडाक्याचे ऊन जाणवणार आहे. सकाळी गारवा आणि दुपारी वाढणारा उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
काल सोलापूर आणि अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर महाबळेश्वर येथे नीचांकी १३.९ अंश तापमान नोंदवले गेले. तापमानातील चढ-उतारामुळे हवामानात अनिश्चितता कायम आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार उर्वरित राज्यात उकाडा वाढणार असून काही भागांत ढगाळ वातावरण राहील. रात्रीच्या वेळी काही ठिकाणी गारठाही जाणवू शकतो.
दरम्यान, याआधी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः मका आणि द्राक्ष पिकांना फटका बसला असून उभे पीक आडवे पडल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे शेतीसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.


