पुणे: पुणे जिल्ह्यातील उद्योग नगरीत चक्क सुरक्षा रक्षकावरच चाकू हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदाम कामिठे असं जखमी सुरक्षा रक्षकाचं नाव असून, राम लोंढे असं हल्लेखोर आरोपीचं नाव आहे. ही घटना चिंचवड गावातील शांतीबन सोसायटीमध्ये घडली आहे.
सुदाम कामिठे हे पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड गावात शांतीबन सोसायटीच्या गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. आरोपी राम लोंढे हा जबरदस्तीने सोसायटीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी सुरक्षा रक्षक सुदाम कामिठे यांनी त्याला अडवून विचारणा केली की, “कसा घुसतोस?”
त्या वेळी काही वेळ दोघांमध्ये बोलणे झाले. मात्र, गप्पा मारल्यानंतर अचानक राम लोंढे याने चाकू बाहेर काढून सुदाम कामिठे यांच्यावर हल्ला केला. कामिठे यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी टेबलवरील वीट उचलली. मात्र, आरोपीने तीच वीट त्यांच्या हातून हिसकावून घेत डोक्यावर मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी राम लोंढे याने काही दिवसांपूर्वी शांतीबन सोसायटीत हाऊसकीपिंगचे काम केले होते. मात्र, तो व्यसनाधीन असल्याने त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळेच रागाच्या भरात त्याने हा हल्ला केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.


