पाटस (पुणे): एसटी बसच्या मागे धावताना अचानक पडून वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पाटस (ता. दौंड) येथील बस थांब्यावर घडली. याप्रकरणी पाटस पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून त्या व्यक्तीचा ‘हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. पुरुषोत्तम रावसाहेब आटोळे (रा. हादगाव, ता. कर्जत) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम आटोळे हे नंदादेवी (ता. दौंड) येथे मुलीकडे जाण्यासाठी पाटस येथील बस थांब्यावर थांबले होते. यावेळी पाटस येथील बस थांब्यावर बस पुढे निघून गेल्याने बसमध्ये जाण्यासाठी पुरुषोत्तम आटोळे बसच्या मागे पळत असताना ते अचानक खाली पडले. यावेळी स्थानिकांनी पाटस येथील टोल नाका रुग्णवाहिकेला फोन केला. रुग्णवाहिकेतून त्यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासले असता आटोळे यांना मृत घोषित केले.
यामुळे रुग्णवाहिका चालकाने ही रुग्णवाहिका पाटस पोलीस स्टेशन येथे नेऊन संबंधित व्यक्ती मृत झाल्याची माहिती पाटस पोलीस स्टेशन येथे दिली. रुग्णवाहिका चालकांनी या व्यक्तीच्या मोबाईलवरून त्यांच्या नातेवाईकांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. आटोळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यवत ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले. मृत्यू ‘हार्ट अॅटॅकने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.


