Monsoon Update : राज्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. केरळमध्ये पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून महाराष्ट्रातही मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आज विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांतही हवामानात बदल होणार असून काही ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो. तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख ११ जून मानली जाते. दरम्यान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने राज्यातील नागरिकांना उकाड्यापासून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


