Pune Crime : पुण्यातील महर्षीनगर परिसरातून संतापजनक घटना समोर आली आहे. जनगणनेचे काम करण्यासाठी गेलेल्या पुणे महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मे रोजी दुपारी मीनाताई ठाकरे वसाहत परिसरात जनगणनेचे काम सुरू असताना आरोपींनी महिला कर्मचाऱ्याला अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा कामासाठी गेल्यानंतर संबंधित कुटुंबीयांनी जुन्या वादाच्या रागातून तिच्यावर दगडाने हल्ला केला तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे.
या प्रकरणी विकास मोरे, क्रांती मोरे, मुक्ता कसबे, अभिजीत मोरे यांच्यासह इतर अनोळखी महिला-पुरुषांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


