Mumbai Pune Highway : मुंबई, पुणे, मराठवाडा आणि अहिल्यानगर या महत्त्वाच्या भागांना जोडणाऱ्या वाहतुकीसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने नेरळ-वांद्रे-पाईट-शिरोली-पाबळ-मळठण-शिरूर या १३४ किलोमीटर लांबीच्या चौपदरी महामार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या महामार्गामुळे मुंबई-पुणे-मराठवाडा दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होणार असून वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
हा प्रकल्प राज्याच्या दळणवळण व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात असून मुंबई आणि जेएनपीटी बंदराशी थेट संपर्क प्रस्थापित होणार आहे. त्यामुळे औद्योगिक मालवाहतूक, व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे. राज्याच्या आर्थिक विकासासाठी हा महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
औद्योगिक पट्ट्यांना मोठा दिलासा
या महामार्गाचा सर्वाधिक फायदा खेड एसईझेड, तळेगाव, चाकण, रांजणगाव आणि सुपा या प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना होणार आहे. सध्या वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या रस्ते सुविधांमुळे उद्योगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. नव्या चौपदरी मार्गामुळे मालवाहतूक जलद होईल आणि उद्योग विस्ताराला गती मिळेल.
यासोबतच खेड, शिरूर, आंबेगाव आणि मावळ तालुक्यातील ग्रामीण व निमशहरी भागांच्या विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. रोजगारनिर्मिती, नव्या व्यवसाय संधी आणि पायाभूत सुविधांचा विकास यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होण्याची शक्यता आहे.
पुणे-शिरूर मार्गावरील ताण कमी होणार
पुणे-शिरूर महामार्गावरील वाढती वाहनसंख्या आणि सततची वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनली होती. नव्या पर्यायी महामार्गामुळे विद्यमान मार्गावरील ताण कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी होणार आहे.
अजित पवारांचा पाठपुरावा
या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले जात आहे. आधुनिक पायाभूत सुविधा उभारून राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही हा प्रकल्प महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल, असे म्हटले आहे.


