Ashok Kharat Case : प्रतिभा चाकणकर या शिर्डी पोलिस ठाण्यात हजर झाल्या असून, भोंदू अशोक खरात प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा समता पतसंस्थेतील तब्बल 132 खात्यांमध्ये नामनिर्देशित (नॉमिनी) आहे. यापैकी चार खाती चाकणकर कुटुंबीयांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. त्यात दोन खाती प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर, तर दोन त्यांच्या मुलांच्या नावावर आहेत. या खात्यांमधून सुमारे 2 कोटी 40 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
या पार्श्वभूमीवर ही खाती स्वतः चाकणकर यांनी उघडली होती की त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून अशोक खरातने ती उघडली, याचा तपास सध्या सुरू आहे. खरात भक्तांकडून आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या प्रती घेत असल्याचेही समोर आले असून, त्याच माध्यमातून बनावट खाती उघडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, अशोक खरातची पोलिस कोठडी आज संपत असून, एसआयटीकडून त्याची कोठडी वाढवण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.


