Pav Price Hike : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना आणखी एक मोठा फटका बसला आहे. पेट्रोल-डिझेल आणि दुधाच्या दरवाढीनंतर आता पाव आणि ब्रेडच्या किंमतीतही वाढ झाली आहे. आजपासून पावाच्या विविध प्रकारांच्या किंमतीत वाढ लागू करण्यात आली आहे.
एका लादीमागे ५ रुपयांची वाढ
मिळालेल्या माहितीनुसार, ६ पावांच्या एका लादीमागे तब्बल ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती, पॅकेजिंग आणि वाहतूक खर्चातील वाढ यामुळे कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने आयात खर्चही वाढला आहे.
मॉडर्न ब्रेडकडून दरवाढ लागू
१६ मेपासून मॉडर्न ब्रेड कंपनीने बेसिक प्रकारांच्या ब्रेडमध्ये दरवाढ लागू केली आहे. त्यानंतर आता ब्रिटानिया आणि विब्ससारख्या कंपन्याही लवकरच किंमती वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवीन दर काय?
- ४०० ग्रॅम सँडविच ब्रेड : ४० वरून ४५ रुपये
- हेल व्हीट ब्रेड : ५५ वरून ६० रुपये
- मल्टीग्रेन ब्रेड : ६० वरून ६५ रुपये
- लहान ब्राउन पाव : २८ वरून ३० रुपये
- व्हाईट लोफ : २० वरून २२ रुपये
- ब्राउन ब्रेड : ४५ वरून ५० रुपये
- वडापाव आणि खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता
पावाच्या दरवाढीचा परिणाम आता वडापाव, मिसळपाव आणि इतर खाद्यपदार्थांच्या किंमतीवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या मासिक बजेटवर आणखी ताण वाढणार आहे.


