पिंपरी : महापालिकेच्या अग्निशामक विभागासाठी अग्निशामक विमोचक (फायरमन रेस्क्युअर) या पदाच्या १५० जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. लेखी व मैदानी परीक्षेनंतर अखेर उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केली आहे.
पिपरी-चिंचवड शहर आणि परिसरात मागील काही वर्षांपासून आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सद्यःस्थितीत अग्निशामक दलाकडे असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत आहे. याचा विचार करून महापालिका प्रशासनाने गेल्यावर्षी अग्निशामक दलासाठी १५० फायरमनची भरती प्रक्रिया राबवली. फायरमनच्या १५० जागांसाठी एक हजार ५०० अर्ज आले. या परीक्षार्थीची २९ ऑगस्ट २०२४ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत ८९५ उमेदवार उत्तीर्ण झाले.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने चाचणी घेण्यास नकार दिल्याने ही परीक्षा रखडली होती. त्यानंतर २२ ते २४ जानेवारी २०२५ या कालावधीत भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात शंभर गुणांची शारिरिक क्षमता मैदानी चाचणी घेण्यात आली. शारीरिक क्षमता आणि मैदानी चाचणीनंतर १५० जागांसाठी ६४३ उमेदवार पात्र ठरले आहेत. या पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात आली. त्यानंतर अखेर अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. यासोबत अपात्र झालेल्या उमेदवारांची यादीही कारणांसह पालिकेने प्रसिध्द केली आहे.


