Baramati Crime News | बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेळ्या व बोकड चोरणाऱ्या टोळीचा वडगाव निंबाळकर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 12 लाख 95 हजार 850 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, लहान-मोठ्या 32 शेळ्या व बोकड जप्त करून संबंधित शेतकऱ्यांना परत दिले आहेत.
या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील अशोक बाबुराव जाधव याला अटक करण्यात आली असून, अन्य दोन आरोपी फरार आहेत. अटक केलेल्या जाधववर वडगाव निंबाळकर, लोणंद व हडपसर पोलीस ठाण्यात यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
टोळीच्या ताब्यातील पिकअप वाहनातून 2 तलवारी, 3 कोयते, 1 लोखंडी रॉड, स्क्रू ड्रायव्हर, तार कटर, चाकू, लाकडी काठी, प्लास्टिक पाईप आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. या टोळीशी संबंधित आणखी मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सदोबाचीवाडी (ता. बारामती) येथील शेतकरी संजय जगन्नाथ होळकर यांच्या गोठ्यातून चार बोकड व एक शेळी चोरीला गेल्याच्या घटनेत गुन्हे शोध पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे अजय सतीश होळकर, आर्यन सचिन माने आणि बंटी नंदकुमार घोडके या तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
या आरोपींनी लोखंडी जाळी तोडून चोरी केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी चारही बोकड व एक शेळी तसेच चोरीसाठी वापरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पोपट नाळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तसेच वाघळवाडी येथेही पहाटे पिकअपमधून आलेल्या चोरट्यांनी चार शेळ्या चोरण्याचा प्रयत्न केला. शेतकरी जागा झाल्याने एक शेळी वाचली, तर तीन शेळ्या चोरट्यांनी पळवून नेल्या. या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी दिली.


