इंदापूर: इंदापूर पोलीस वसाहतीमधील पोलीस हवालदार विष्णू केमदारणे मंगळवार १० जून रोजी पहाटे बेपत्ता झाल्यामुळे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. विष्णू केमदारणे यांनी घरातून निघून जाण्यापूर्वी पत्नीच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. चिठ्ठीमध्ये इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. तुझी नोकरी व यापुढील आयुष्य हे उद्ध्वस्त करून टाकेल, अशी भाषा वापरून मला जिवे मारण्याची धमकी दिली आहे, असे या चिठ्ठीत लिहिलेले आहे.
मात्र, या संदर्भात वरिष्ठ बोलतील, असे सांगून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. विष्णू केमदारणे यांनी त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर एक कॉल रेकॉर्डिंग ऑडिओदेखील पाठवलेला आहे. माझ्या या अवस्थेला होणाऱ्या परिणामांना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हेच जबाबदार आहेत, असेही या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आले आहे.
इंदापूर पोलीस ठाण्यात विष्णू केमदारणे यांच्या पत्नी प्रियंका केमदारणे यांनी आपले पती हरवल्याची तक्रार देखील दाखल केली असून, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना सवाल उपस्थित केला आहे. खात्याव्यतिरिक्त तुम्ही माझ्या पतीला वैयक्तिक धमकी का देताय, माझ्या पतीला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा मी माझ्या मुलाबाळांसह इंदापूर पोलीस ठाण्यासमोर आत्महत्या करेल, असा इशारा ही त्यांनी दिला.


