इंदापूर : चालू आठवड्यात इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारात विक्रीसाठी आलेल्या डाळींबाला प्रति किलोस २७५ रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला आहे. प्रति क्विंटल २ हजार २०० रुपये या दरात कांद्याची विक्री झाली आहे. पेरुला प्रति किलोस ५५ रुपये दर मिळाला आहे. तर ड्रॅगनफ्रूटला प्रति किलोस ८१ रुपये दर मिळाला आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके यांनी दिली.
ढुके म्हणाले की, धान्य सफाई यंत्र सुविधा उभारणी केलेली आहे. आंध्र प्रदेश, कोलकाता, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड या राज्यांतील खरेदीदार डाळींब, पेरु, ड्रॅगनफुट शेतमाल उच्चांकी दरात खरेदी करत आहेत. मुख्य बाजार आवार व उपबाजाराच्या ठिकाणी विविध वजनाचे भुईकाटे बसविण्यात आले आहेत. उपबाजार भिगवण राशीन रस्त्यालगतच्या बाजार आवाराच्या जागेत नव्याने १०० मेट्रिक टन क्षमतेच्या भुईकाट्याच्या उभारणीचे काम सुरू आहे. तेथे लवकरच २४ तास सेवा मिळेल. उपबाजार वालचंदनगर-कळंब येथे शेतकरी व इतर संबंधितांच्या मुला-मुलींचा विवाह सोहळा माफक दरात पार पाडण्यासाठी बळीराजा मंगल कार्यालयाची उभारणी केलेली आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांनी बाजार समितीने दिलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


