Sinhgad Institute Crisis: पुणे शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तब्बल सोळा महिन्यांपासून पगार थकल्याने कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे शैक्षणिक कामकाजावर मोठा परिणाम होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिंहगड इन्स्टिट्यूट प्रशासनाने त्वरित आमच्या पगारी द्याव्या नाहीतर उग्र आंदोलन केलं जाईल असा इशारा कर्मचारी संघटनानी दिला आहे.
16 महिन्यांपासून नियमित वेतन मिळालेले नाही.
कर्मचारी संघटनांच्या म्हणण्यानुसार, संस्थेतील अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गेल्या 16 महिन्यांपासून नियमित वेतन मिळालेले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही पगाराबाबत ठोस निर्णय घेतला गेला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. आर्थिक अडचणींमुळे अनेक कर्मचाऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढला असून दैनंदिन खर्च भागवणेही कठीण झाले आहे. अनुभवी शिक्षक नोकरी सोडून जात असल्याने त्यांच्या जागी नवीन शिक्षक नेमले जात आहेत; मात्र त्यांनाही वेळेवर वेतन मिळत नसल्याची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनांनी बेमुदत कामबंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. आंदोलनामुळे अध्यापनासह प्रशासकीय कामकाजही विस्कळीत झाले आहे. विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिके, अंतर्गत परीक्षा, तसेच इतर शैक्षणिक उपक्रमांवर याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्यावर्षी कार्यालय झाले होते सील
दुसरीकडे, गेल्यावर्षी सिंहगड टेक्नीकल इन्स्टिट्यूट या शिक्षण संस्थेच्या वडगाव बुद्रुक येथील 43 आणि कोंढवा येथील 6 मिळकतीच्या कराच्या थकबाकीपोटी महापालिकेच्या मिळकत कर विभागाने संस्थेचे वडगाव येथील कार्यालय सील केले होते. या संस्थेच्या शहरात एकूण 128 मिळकतींचा 345.43 कोटी रुपये मिळकत कर थकला होता. सिंहगड टेक्नीकल इन्स्टिट्यूट या शिक्षण संस्थेच्या शहरात विविध ठिकाणी मिळकती आहेत. या मिळकतींच्या करासंदर्भात महापालिका व संस्था यांच्या न्यायालयात वाद सुरू आहेत. संस्थेच्या 128 मिळकतींचा तब्बल 345.43 कोटी मिळकत कर थकला आहे. एरंडवणा येथील संस्थेचे मुख्य कार्यालय 47.43 कोटीच्या थकबाकीपोटी महापालिकेने सील केले आहे.


