पुणे : पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणात राजकीय वाद तीव्र झाला आहे. माजी आमदार आणि शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र धंगेकर यांनी एक्सवर खोचक पोस्ट करून भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे.
“काय म्हणता धंगेकर, जमीन चोर निघाला मुरलीधर..! Stay tuned..! #saveHND #punelandscam @ANI” असे लिहून धंगेकर यांनी मोहोळ यांना “जमीनचोर” संबोधले आहे. ही पोस्ट १८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली असून, ती पुण्यातील राजकारणात शिवसेना (शिंदे) आणि भाजप यांच्यातील तणाव वाढवण्याची शक्यता निर्माण करत आहे. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडूनच असा शड्डू ठोकला गेल्याने मोहोळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मॉडेल कॉलनी परिसरातील ही ३.५ एकर जागा जैन समाजाची आहे. या जागेची बेकायदेशीर विक्री गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला करण्यात आली असून, या कंपनीत मोहोळ यांची भागीदारी असल्याचा आरोप जैन संघटनेने केला आहे. जैन गुरूंच्या नेतृत्वाखालील आंदोलकांनी या विक्रीला विरोध करताना एका गुरूंनी उपवास घेतला असून, १५ दिवसांत करार रद्द न झाल्यास आमरण उपोषण करण्याची धमकी दिली आहे.
भाजपाकडून मात्र मोहोळ यांचा आणि गोखले कंपनीचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी कथित कागदपत्रेही सादर करण्यात आली आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोहोळ यांनी धंगेकर यांच्याविरुद्ध १ लाख २३ हजार ०३८ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. आता हा घोटाळा त्यांच्या राजकीय करिअरवर परिणाम करू शकतो.
धंगेकर काय पुरावे सादर करणार?
धंगेकर यांनी पोस्टमध्ये “Stay tuned” असा उल्लेख करून लवकरच अधिक माहिती देण्याचे संकेत दिले आहेत. ते पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाने पुण्यातील महायुतीतील अंतर्गत कलह उघड झाला असून, पुढील काळात वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.


