Pune Mhada Lottery News : पुणे, पिंपरी-चिंचवडसह सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो नागरिकांचं घराचं स्वप्न आता प्रत्यक्षात येणार की नाही, याचा फैसला उद्या होणार आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाअंतर्गत विविध प्रकल्पांमधील 4,186 सदनिकांची संगणकीय सोडत मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता काढली जाणार आहे.
ही सोडत पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात पार पडणार असून, पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते ती काढण्यात येणार आहे. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) हे मुंबईहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत.
अर्जदारांचा विक्रमी प्रतिसाद
पुणे म्हाडाच्या या सोडतीला सर्वसामान्य नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. एकूण 4,186 सदनिकांसाठी 2,58,832 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 2,15,965 अर्जदारांनी विहित मुदतीत अनामत रक्कम भरली असून, फक्त हेच पात्र अर्जदार उद्याच्या अंतिम सोडतीत सहभागी असतील.
कुठल्या घरांचा समावेश?
या सोडतीत पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) अंतर्गत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील 3,322 सदनिका आणि 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील 864 सदनिका यांचा समावेश करण्यात आला आहे. अर्जदारांच्या मागणीनुसार, काही तांत्रिक अडचणी आणि निवडणूक आचारसंहितेमुळे अर्ज भरण्याच्या मुदतीस दोन वेळा वाढ देण्यात आली होती.
घरबसल्या पाहा थेट सोडत
ज्या अर्जदारांना प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित राहता येणार नाही, त्यांच्यासाठी म्हाडाने ऑनलाईन थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अर्जदारांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सोडतीची लिंक पाठवण्यात आली असून, म्हाडाच्या अधिकृत YouTube चॅनेलवर दुपारी 12 वाजल्यापासून ही सोडत थेट पाहता येणार आहे. पारदर्शक प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे म्हाडा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


