Uddhav Thackeray News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर आता विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे. भाजप नेते आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील पुनर्निवडीबाबत केलेल्या विधानामुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहीर होण्यापूर्वी पंकज भोयर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीच्या विजयाचं श्रेय सरकारच्या कामगिरीला दिलं. जनतेने विरोधकांना नाकारलं असून, विरोधी पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे त्यांची अवस्था त्रेधातिरपीट झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. याच कारणामुळे काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असावा, असंही भोयर म्हणाले.
याच संवादात उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील सदस्यत्वाबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, भोयर यांनी थेट शंका उपस्थित केली. “उद्धव ठाकरे पुन्हा कोणत्याही सभागृहात पोहोचू शकतील की नाही, याबाबत संशय आहे,” असं विधान त्यांनी केलं.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत मे 2026 मध्ये संपत आहे. सध्याच्या राजकीय गणिताकडे लक्ष वेधताना पंकज भोयर यांनी सांगितलं की, ठाकरे गटाकडे सध्या केवळ 20 आमदार आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी आवश्यक असलेला सुमारे 29 ते 30 मतांचा कोटा पूर्ण करणं त्यांच्यासाठी कठीण ठरू शकतं. त्यामुळे त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या अतिरिक्त मतांवर अवलंबून राहावं लागेल.
मात्र, महाविकास आघाडीत सध्या राज्यसभेच्या जागांवरूनही अंतर्गत मतभेद आणि ओढाताण सुरू असल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर पंकज भोयर यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.
दरम्यान, अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संभाव्य राजकीय प्रवेशावरही पंकज भोयर यांनी टोला लगावला. “ते उत्तम अभिनेते आहेत, पण सक्रिय राजकारणात येऊन राजकीय चर्चा कधीपासून करायला लागले, याचं आश्चर्य वाटतं,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली.


