पुणे: पुणे महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता डिसेंबर महिन्यात लागू होण्याची शक्यता वाढल्याने राजकीय हालचालींसह महापालिका प्रशासनानेही कामांना गती दिली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुमारे 1250 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्याची तयारी सुरू असून हे कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होऊ शकतात.
या प्रकल्पांमध्ये समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बांधलेल्या वीस पाण्याच्या टाक्या आणि चाळीस पाणी वितरण झोनचे लोकार्पण, तसेच इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, जागतिक सायकल स्पर्धेचा मार्ग, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, खराडी, चांदणी चौक आणि बाणेर येथील अग्निशमन केंद्रे, अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ए आणि बी विंग आणि नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाची नवी इमारत यांसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे.
या सर्व कामांचा खर्च मिळून सुमारे 836 कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणे बिंदूमाधव चौक आणि पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल आणि समतल विलगक, शेवाळवाडी पाणी पुरवठा प्रकल्प, मुंढवा केशवनगर टाक्या आणि जलवाहिनी, तसेच वडगाव जलशुद्धीकरण केंद्रासारख्या प्रकल्पांचे एकूण 413 कोटी रुपयांचे भूमिपूजन होणार आहे. महापालिकेच्या प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील दोन आठवड्यांत मतदार यादीही अंतिम होईल. निवडणुका डिसेंबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतात, अशी चर्चा असून महापालिका प्रशासनाकडून प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत बैठका घेऊन आढावा सुरू आहे.


