Flight Fare Hike: इंडिगोच्या देशभरातील उड्डाण व्यवस्थेत निर्माण झालेल्या गंभीर अडचणींचा आता थेट परिणाम प्रवाशांच्या खिशावर दिसू लागला आहे. गेल्या दोन दिवसांत इंडिगोची १,००० हून अधिक उड्डाणे रद्द झाली असून शेकडो उड्डाणांमध्ये प्रचंड विलंब होत आहे. परिणामी, देशातील प्रमुख मार्गांवरील विमान भाडे गगनाला भिडले आहेत.
मेट्रो शहरांच्या मार्गांवर तिकिटांच्या किमती दुप्पट-तिप्पट
दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या मोठ्या शहरांमधील फ्लाइट रूट्सवर प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. इंडिगो रद्दीकरणामुळे पर्यायी विमानांची मागणी अचानक वाढली असून इतर विमान कंपन्यांनीही भाड्यांमध्ये झपाट्याने वाढ केली आहे. विशेष म्हणजे, दिल्ली विमानतळावरून आज रात्रीपर्यंत सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आल्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. उच्च मागणीमुळे तिकिट दर अगोदरच्या तुलनेत ४ ते ८ पट वाढले आहेत.
मुख्य मार्गांवरील भाडेवाढ
- दिल्ली-बेंगळुरूचे भाडे ६,०००-८,००० वरून ४३,००० पर्यंत वाढले आहे.
- दिल्ली-पाटणा भाडे ४,०००- ५,००० वरून २३,००० पेक्षा जास्त झाले आहे.
- दिल्ली-हैदराबादचे भाडे ५,०००-७,००० वरून ३६,००० पर्यंत वाढले आहे.
- दिल्ली-अहमदाबादचे तिकिट, ज्याची किंमत सामान्यतः ३,०००-४,००० असते, ते आता २३,००० पर्यंत पोहोचले आहे.
- दिल्ली-कोलकाता भाडे ७,०००-९,००० वरून ६२,००० पर्यंत वाढले आहे.
- दिल्ली-गोवा प्रवास भाडे ५,०००-६,००० वरून ३०,००० पेक्षा जास्त झाले आहे.
प्रवाशांचे बजेट कोलमडले
इंडिगोच्या अडचणींमुळे निर्माण झालेल्या देशव्यापी गोंधळाचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. तातडीच्या प्रवासासाठी पर्याय मर्यादित असल्याने अनेकांना प्रचंड महाग तिकिटे घ्यावी लागत आहेत. ट्रॅव्हल पोर्टल्सवरील भाड्यातील तात्काळ चढ-उतारामुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते, उड्डाणे सुरळीत होईपर्यंत ही महागाई आणखी वाढू शकते.


