मुंबई : 2012 मधील पुणे साखळी बॉंबस्फोट प्रकरणातील आरोपी फारुख बागवान याला 12 वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यामुळे, बागवान लवकरच तुरुंगातून बाहेर येणार आहे.
यापूर्वी, या प्रकरणातील दुसरा आरोपी असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार याला 19 जानेवारी 2023 रोजी जामीन मिळाला होता. बागवान याच्यावर कोणताही अन्य गुन्हा नसल्याचे आणि खटला जलदगतीने निकाली निघण्याची शक्यता कमी असल्याचे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने हा निर्णय घेतला आहे. या निकालाने बागवान याला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले की, फारुख बागवान याच्यावर पुणे साखळी बॉंबस्फोट प्रकरणाव्यतिरिक्त इतर कोणताही गुन्हा दाखल नाही. याशिवाय, या प्रकरणातील इतर आरोपींना जामीन मिळाल्याच्या समानतेच्या तत्त्वावर बागवान यालाही जामीन मिळण्याचा अधिकार आहे. न्यायालयाने हेही नमूद केले की, प्रत्येक आरोपीला जलदगतीने खटला निकाली काढण्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, बागवान याच्या खटल्याचा निकाल लवकर लागण्याची शक्यता कमी असल्याने, त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
पुणे साखळी बॉंबस्फोट प्रकरण काय आहे?
1 ऑगस्ट 2012 रोजी पुण्यातील जंगली महाराज रोडवरील डेक्कन परिसरात पाच साखळी बॉंबस्फोट घडले होते. या स्फोटांमध्ये एक व्यक्ती जखमी झाली होती. डेक्कन परिसरात सहा ठिकाणी बॉंब ठेवण्यात आले होते, त्यापैकी पाच बॉंब काही मिनिटांच्या अंतराने फुटले, तर एक बॉंब निष्क्रिय राहिला. बॉंब बनवण्यात दहशतवाद्यांकडून त्रुटी राहिल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, या स्फोटांमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला अनेकांना या स्फोटांचे गांभीर्य समजले नव्हते, पण सलग पाच बॉंब फुटल्याने दहशतवादी हल्ल्याची भीती निर्माण झाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत निष्क्रिय बॉंब निकामी केला.
बॉंब ठेवण्यात आलेली ठिकाणे
1. बालगंधर्व रंगमंदिर
2. मॅकडोनाल्ड कॅफे
3. देना बँक
4. गरवारे पूल
5. आणखी एक ठिकाण (निष्क्रिय बॉंब)


