Zombies In Pune : पुण्यातील नरपतगिरी चौक परिसरातून समोर आलेल्या एका धक्कादायक व्हिडिओने शहरात खळबळ उडवली आहे. भरदुपारी एक तरुण तब्बल दोन तास एकाच जागी कोणतीही हालचाल न करता उभा असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने केलेल्या विचित्र हालचालींमुळे हा प्रकार ‘झोंबी ड्रग्ज’शी संबंधित असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, दोन ते तीन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. सुरुवातीला संबंधित तरुण एखाद्या सोशल मीडिया रीलसाठी स्टंट करत असल्याचा अनेकांना संशय होता. मात्र बराच वेळ उलटल्यानंतरही तो हलत नसल्याने नागरिकांना धक्का बसला.
काही वेळानंतर त्या तरुणाने अनियंत्रित आणि विचित्र हालचाली करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुण्यातही अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
मुंबई आणि मीरा-भाईंदर परिसरात याआधी अशाच प्रकारचे व्हिडिओ समोर आले होते. आता पुण्यातील या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, संबंधित व्हिडिओची अधिकृत पुष्टी झालेली नसून पोलिस किंवा अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


