Vikas Lavande Ink Attack : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत कारवाईबाबत चर्चा केली आहे.
घटनेनंतर विकास लवांडे यांनी पुण्यातील मोदी बाग येथे शरद पवारांची भेट घेतली. रात्री उशिरा स्वतः फोन करून पवारांनी लवांडेंना बोलावल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत लवांडेंनी संपूर्ण घटनाक्रम, मागील काही दिवसांपासून सुरू असलेला वाद आणि त्यासंबंधीची परिस्थिती शरद पवारांसमोर मांडली.
घटनाक्रम ऐकल्यानंतर शरद पवारांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांसह पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी थेट संपर्क साधला. सार्वजनिक जीवनात कार्यरत व्यक्तीवर अशा प्रकारचा हल्ला गंभीर असल्याचे सांगत त्यांनी निष्पक्ष तपास आणि विकास लवांडे यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली.
दरम्यान, हे प्रकरण आणखी गंभीर होत असून शरद पवार आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणावर राज्य सरकारची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


