पुणे : पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन घोटाळा प्रकरणाने राजकारण ढवळून निघाले असताना, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. एक्सवर धडक पोस्ट टाकत धंगेकरांनी निवडणुकीतील एफिडेविट जोडत मोहोळांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्याचा दावा केला आहे.
इतकेच नव्हे, तर “जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली दोन प्रकरणे” घेऊन लवकरच भेटण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या आरोपांनी पुण्याच्या राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं असून, महायुतीत अंतर्गत कलह उफाळून आला आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले, “अतिशय सुसंस्कृत व सरळमार्गी वाटणारे मुरलीधर मोहोळ हे कशा पद्धतीने खोटे बोलतात याचे उदाहरण मी तुम्हाला देतो. काल माध्यमांशी बोलताना त्यांनी सरळ सांगितलं की त्यांच्यावर एकही गुन्हा नाही. मी या ट्विटसोबत आपल्याला त्यांच्या इलेक्शन एफिडेविट मधील पानांची कॉपी जोडतोय.
त्यांच्यावर किती गुन्हे आहेत ते कशाकशा संदर्भात आहेत अगदी ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर दाखल आहे.” या आरोपामुळे मोहोळांच्या प्रतिमेला धक्का बसला असून, धंगेकरांनी हे “प्रेस आणि पुणेकरांची फसवणूक” असल्याचेही म्हटले आहे.
अतिशय सुसंस्कृत व सरळमार्गी वाटणारे मुरलीधर मोहोळ हे कशा पद्धतीने खोटे बोलतात याचे उदाहरण मी तुम्हाला देतो. काल माध्यमांशी बोलताना त्यांनी सरळ सांगितले की त्यांच्यावर एकही गुन्हा नाही.
मी या ट्विट सोबत आपल्याला त्यांच्या इलेक्शन एफिडेविट मधील पानांची कॉपी जोडतोय त्यांच्यावर… pic.twitter.com/DWeSVtk40h
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 24, 2025
महापौर असताना बिल्डरची इनोव्हा? धंगेकरांचा नवीन आरोप
पुढे धंगेकर म्हणाले, “पुणे शहराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन होस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी गेल्या काही दिवसांत पाहिले आहेत. परंतु तरी देखील ते या सर्व गोष्टी योगायोग असल्याचं ते सांगतात. मी आपणास काही माहिती देऊ इच्छितो, मोहोळ हे खासदार होण्याच्या अगोदर पुण्यनगरीचे महापौर होते.
हे महापौर असताना पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाटी लावून महापौर पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा वापरायचे. त्या गाडीचा नंबर होता MH12 SW 0909. ही गाडी ना मोहोळ यांची होती, ना पुणे महानगरपालिकेचं शासकीय वाहन. ही गाडी होती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची.”
“हे तेच बिल्डर आहे ज्यांनी जैन होस्टेल खरेदी करण्यासाठी दोन नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर. पुणे महानगरपालिकेत महापौर हे संविधानिक पद सांभाळत असताना एका खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का?
साडेनऊ हजार कोटींचं बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी घेता नाही आली का? या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले? विशेषतः कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बढेकर बिल्डरला देण्यात आलेले आहेत.” या आरोपांसह धंगेकरांनी व्हिडिओ शेअर केला असून, याने मोहोळांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


