Pune News : बारामती विमान दुर्घटनेप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असून रोहित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. कर्नाटकातील बंगळुरू येथील शेषाद्रीपुरम पोलीस ठाण्यात ‘झिरो FIR’ अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
२८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीकडे जात असताना VT-SSK नोंदणी असलेले Bombardier Learjet 45 विमान कोसळले होते. या भीषण दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश होता.
या प्रकरणी रोहित पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत तक्रार दाखल करत ही दुर्घटना केवळ अपघात नसून मोठ्या गुन्हेगारी कटाचा भाग असू शकते, असा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी यापूर्वी मुंबई आणि बारामती येथे तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तेव्हा FIR दाखल झाला नव्हता.
तक्रारीनुसार, संबंधित विमान कंपनीकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन, देखभाल प्रक्रियेत निष्काळजीपणा आणि बनावट नोंदी तयार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) अहवालातही काही विमाने उड्डाणासाठी अयोग्य असल्याचे नमूद करण्यात आले होते.
विशेष म्हणजे, अपघातग्रस्त विमानाने सुमारे ४९१५ उड्डाण तास पूर्ण केले होते, जे अनिवार्य ‘टाइम बिफोर ओव्हरहॉल’ मर्यादेच्या जवळ होते. तरीही ते व्यावसायिक वापरासाठी चालू ठेवण्यात आले होते. तसेच, प्रत्यक्ष उड्डाण तास अधिक असून अधिकृत नोंदींमध्ये कमी दाखवण्यात आल्याचाही आरोप आहे.
या सर्व बाबींमुळे सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणाचा सखोल गुन्हेगारी तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. तांत्रिक तपासासोबत स्वतंत्र चौकशीची गरज अधोरेखित केली जात आहे.


