Rupali Chakankar and Rupali Thombre Patil : राज्यात आधीच गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणाला आता आणखी गंभीर वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत खळबळ उडवली आहे.
ठोंबरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत दावा केला आहे की, “महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार रुपाली चाकणकर आहेत.” तसेच अशोक खरातने केलेल्या कथित गैरकृत्यांमागे चाकणकर यांचा पाठिंबा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पत्रात ठोंबरे यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. एका पत्रकाराला धमकावून माफी मागायला लावल्याचा आरोप, पोलिसांवर दबाव टाकून गुन्हे दाखल केल्याचा दावा, तसेच खरातला वाचवण्यासाठी हस्तक्षेप केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या सर्व बाबींवर सखोल चौकशी करून चाकणकर यांना आरोपी करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या आरोपांमुळे चाकणकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, आता त्यांच्या पक्षातील पदावरही गदा येण्याची शक्यता आहे.
या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, तपास यंत्रणा याकडे कशा प्रकारे पाहतात आणि पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


