Rupali Chakankar : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची एसआयटीकडून तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत चाकणकरांनी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला आध्यात्मिक श्रद्धेपोटी गुरू मानल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.
अशोक खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर विरोधकांच्या टीकेमुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही हटवण्यात आले होते.
रविवारी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या उपस्थितीत झालेल्या चौकशीत चाकणकरांना खरातसोबतचे संबंध, त्यांच्यावरील आरोप आणि विविध घडामोडींविषयी सविस्तर प्रश्न विचारण्यात आले.
चौकशीदरम्यान चाकणकरांनी सांगितले की, त्यांचे कुटुंब वारकरी संप्रदायाशी जोडलेले असून आध्यात्मिक श्रद्धेपोटी त्यांनी खरात दाम्पत्याला गुरू मानले होते. मात्र, खरातसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नव्हते आणि त्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी मी कोणालाही प्रवृत्त केले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
तसेच, खरातची दुसरी बाजू आपल्याला माहीत नव्हती, असेही त्यांनी एसआयटीसमोर सांगितले. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना चाकणकर म्हणाल्या की, त्यांनी सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली असून तपासात पूर्ण सहकार्य करणार आहेत. आता एसआयटीच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


