Rupali Chakankar business in Raigad : अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर आधीच टीका होत असताना आता त्यांच्या रायगडमधील व्यावसायिक संबंधांची नवी माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांनंतर या प्रकरणाला अधिकच वेग आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील रोहा येथे निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे बांधकाम व्यवसायात भागीदारीत कार्यरत आहेत. ‘कर्मा कन्स्ट्रक्शन LLP’ या कंपनीच्या माध्यमातून रोठ खुर्द येथे बहुमजली इमारत उभारण्यात आल्याचे समोर आले आहे.
आकाश चौधरी यांच्या नावावर ओशन पर्ल मेरिटाइम प्रायव्हेट लिमिटेड, कोलाड आणि कर्जत रिव्हर राफ्टिंग, गीता अॅग्रो अॅन्ड इन्फ्रा, FL3 हॉस्पिटॅलिटी आणि रॉक हिल अॅडव्हेंचर रिसॉर्ट यांसारखे विविध व्यवसाय नोंदणीकृत आहेत. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर आणि चौधरी यांच्यातील व्यावसायिक संबंधांबाबत चर्चा रंगली आहे.
दरम्यान, या बांधकाम प्रकरणी भाजपचे पदाधिकारी बबलू सय्यद यांनी माणगाव न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला असून यामुळे या व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अशोक खरात प्रकरणात चौकशीची शक्यता; चाकणकरांना समन्स
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातही रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे त्यांनी आधीच महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
खरातशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने आता त्याच्या ‘शिवनिका’ संस्थेच्या व्यवहारांवर लक्ष केंद्रित केले आहे. या संदर्भात रुपाली चाकणकर यांच्यासह संस्थेच्या विद्यमान आणि माजी विश्वस्तांना समन्स बजावल्याची माहिती समोर येत आहे.
आजच त्यांच्या चौकशीची शक्यता व्यक्त केली जात असून पुण्यात त्यांच्या विरोधात ‘गुलाबो गँग’कडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे चाकणकरांच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.


