Rupali Patil Thombre Resignation: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजगी उफाळून आल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पुण्यातील माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्षपदी कार्यरत असलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षश्रेष्ठी अजित पवार यांच्याकडे तो थेट सुपूर्द केला आहे. अजित पवार यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाल्यानंतरच पुढील राजकीय पाऊल ठरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रुपाली पाटील ठोंबरे यांचा नाराजीचा सूर
२०२१ मध्ये मनसेतून बाहेर पडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांचा पक्षातला प्रवास अलीकडेच वादांनी व्यापला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती, ज्यामुळे त्यांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित असल्याची चर्चा रंगली. मात्र ती भेट वैयक्तिक असल्याचे सांगत त्यांनी त्या चर्चांना फाटा दिला होता. तरीही पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे त्या राष्ट्रवादी सोडणार, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती.
हेही वाचा –रुपाली ठोंबरेंनी घेतली श्रीकांत शिंदेंची भेट; शिवसेनेच्या ऑफरबाबतही सांगितलं
‘रुपाली विरुद्ध रुपाली’ वादामुळे वातावरण तापले
राष्ट्रवादीच्या आणखी एक नेत्या रूपाली चाकणकर आणि रुपाली पाटील ठोंबरे यांच्यातील संघर्ष काही दिवसांपासून उघडपणे चर्चेत आहे. बीडमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी आवाज उठवताना रुपाली पाटील यांनी आपल्या भूमिकेला ऐकले गेले नाही, उलट चारित्र्यावर शंका घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. न्याय न मिळाल्यास आम्ही शांत बसणार नाही. आमचा इतिहास अन्याय सहन करण्याचा नाही, आवश्यक असेल तर संघर्ष करायलासुद्धा आम्ही सिद्ध आहोत, अशा शब्दांत त्यांनी चाकणकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. यामुळे ‘रुपाली विरुद्ध रुपाली’ हा अंतर्गत संघर्ष रस्त्यावर आला.
प्रचारकांच्या यादीतूनही नाव वगळले
महापालिका व नगर परिषद निवडणुकांच्या तयारीमध्ये अजित पवार यांनी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून रुपाली पाटील ठोंबरे यांना वगळण्यात आले. आधी प्रवक्त्यांच्या यादीतूनही त्यांना स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे पक्षात त्यांची उपेक्षा होत असल्याचा संदेश त्यांच्या समर्थकांमध्येही गेला. या घडामोडींनंतर त्यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय अपरिहार्य असल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते.
पक्षातून बाहेर पडण्याचे संकेत
वाढती नाराजी, अंतर्गत वाद, सतत होत असलेली उपेक्षा आणि आदेश यामुळे रुपाली पाटील ठोंबरे यांनी पदाचा राजीनामा देत पक्षश्रेष्ठींना स्पष्ट संदेश दिला आहे. आगामी काळात त्या शिंदे गटात प्रवेश करतील का किंवा नवा राजकीय मार्ग निवडतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


