पुणे : महाराष्ट्रात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. लातूर, धाराशिव, हिंगोली आणि नांदेड या चार जिल्ह्यांत शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर झाली आहे, तर सोलापूरला रेड अलर्टमुळे महापूराची भीती वाढली आहे.
नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून, शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेली आहेत. पुढील ४८ तास अति मुसळधार पावसाचा इशारा असल्याने प्रशासन सतर्क आहे.
मराठवाडा-विदर्भात संकट
पैनगंगा आणि नंदी नद्यांना पूर आल्याने हिंगोली-पूसद मार्ग बंद. हिंगोलीच्या कळमदूरी तालुक्यातील माळेगावात पूरस्थितीमुळे शेतकरी आणि वाहतूक अडचणीत. अनेक वाहने रस्त्यावर अडकली. मान्याड नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने शेणकुडमधील पूल पाण्याखाली. परिणामी, वाहतूक पूर्णपणे ठप्प, अनेक गावे एकमेकांपासून तुटली.
सोलापूरात रेड अलर्ट
सोलापूर शहरात सकाळपासून मुसळधार पाऊस. दक्षिण सोलापूर तालुक्यात उळे-कासेगाव पूल पुन्हा पाण्याखाली गेल्याने कासेगावचा संपर्क तुटला. पूरसदृश परिस्थितीमुळे स्थानिक भयभीत. ग्रामस्थांनी पुलाची उंची वाढवण्याची मागणी पुन्हा केली आहे. अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यांनाही पावसाचा फटका, महापूराची शक्यता.
चार जिल्ह्यांत शाळा-कॉलेज बंद
मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील जनजीवन ठप्प झाले आहे. खबरदारी म्हणून लातूर, धाराशिव, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत शाळा आणि कॉलेजांना २७ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली. पुढील ४८ तास अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून, प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला. यापूर्वी बीडमध्येही शाळा बंद झाल्या होत्या.


