फिरायला जाण्याचा अनेकांचा प्लॅन असतो. मात्र, बजेट जास्त असल्याने अनेकजण ते टाळतात. भारतासारख्या विशाल आणि वैविध्यपूर्ण देशात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही खूप पैसे खर्च न करता किंवा अगदी अल्पदरात भेट देऊ शकता. जर तुम्ही एकाच शहरात राहत असाल तर तुम्हाला वाहतूक किंवा निवास व्यवस्था यावर खर्चही करावा लागणार नाही.
तुम्ही पैसे खर्च न करता तुमच्या शहरातील काही प्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेट देऊ शकता. राजधानी दिल्लीतील रहिवासी इंडिया गेट, लोटस टेंपल आणि जंतरमंतर सारख्या अनेक ठिकाणी मोफत भेट देऊ शकतात. जुन्या दिल्लीच्या रस्त्यांवरून चालताना तुम्हाला भारताची खरी नाडी जाणवू शकते. हे ठिकाण फोटोग्राफी प्रेमींसाठी एक बेस्ट स्पॉटच आहे. परदेशी पर्यटक देखील या पर्यटनस्थळांना भेट देतात. मात्र, तुम्ही ही स्थळे अगदी अल्पदरात पाहू शकता. याशिवाय, उत्तर प्रदेशातील गंगा नदीच्या काठावर वसलेले वाराणसी हे जगातील सर्वात जुने जिवंत शहर असल्याचे म्हटले जाते.
वाराणसीचे घाट जगभरात प्रसिद्ध आहेत. लोक येथे गंगा नदीवर बसण्यासाठी, गंगा आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि येथील रस्त्यांवरून भटकण्यासाठी येऊ शकतात. येथील संस्कृती आणि अध्यात्माचा अनुभव घेण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
तसेच पंजाबमधील अमृतसर येथे स्थित, सुवर्ण मंदिर हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे, जे केवळ अध्यात्माचेच नव्हे तर शांतीचे देखील प्रतीक आहे. या ठिकाणी प्रवेश मोफत आहे आणि प्रत्येक पाहुण्याला लंगरमध्ये मोफत जेवण मिळते. हे ठिकाण आत्म्याला शांती देते आणि हृदयाला खरा आनंद देते.


